कल्याण-डोंबिवली परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक व्होडाफोन कंपनीचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली. नेटवर्क गायब झाल्याने मोबाइलधारक 'नॉट रीचेबल' झाले. मोबाइलमधून कार्ड काढून वारंवार फोन 'स्विच्ड ऑन-ऑफ' करूनही नेटवर्क मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी नेटच्या द्वारे एकमेकांशी संपर्क केला. यातून या कंपनीचे नेटवर्कच गायब झाल्याचे लक्षात आले.
व्होडाफोनच्या सर्व्हिस सेंटरमधूनही ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे ग्राहकांच्या संतापात भर पडली. यानंतर ग्राहकांनी आपल्या संतापाला सोशल मीडिया, फेसबुकद्वारे वाट मोकळी करून दिली. तासभरात फेसबुक आणि व्हॉट्स अॅप ग्रुपवर तक्रारींचा पाऊस पडला. तीनच्या सुमारास बंद झालेले व्होडाफोनचे नेटवर्क तब्बल दीड ते दोन तासांनी परतले. यानंतर ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी मोबाइलवर बोलत असताना अचानक संभाषण तुटणे (कॉल ड्रॉप), नेटवर्क नसणे असे प्रकार वाढत असून सर्वसामान्यांना पैसे मोजूनही संपर्क साधताना मर्यादा येत आहेत. तर, अनेक ठिकाणी एअरटेल आणि आयडियाच्यादेखील कॉल ड्रॉपमध्ये कमालीची वाढ झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
नेटवर्क दोन तास गायब