शहरातील रस्त्याच्या वारंवार होणाऱ्या दुरवस्थेबरोबरच पर्यावरणरक्षणासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून टिकाऊ रस्ते बनविण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिकमिश्रित डांबराचा रस्ता तयार करण्यात आला. तब्बल १५० मीटर लांबीच्या सर्वाधिक अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्याची या प्रयोगासाठी निवड करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील सर्वाधिक वाहतुकीच्या रस्त्यांसाठी हा प्रयोग केला जाणार असल्याचे सिटी इंजिनीअर सपना कोळी यांनी सांगितले.
शहरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावताना प्रशासनाची दमछाक होत असल्यामुळेच हे टाकाऊ प्लास्टिक रस्त्यासाठीच्या डांबरात मिसळून नष्ट करण्याचा प्रयत्न रुद्र फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला. कचऱ्यात पडलेल्या प्लास्टिकच्या पांढऱ्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या जमा करून या पिशव्यांचे २.६ मिमीपर्यंत बारीक तुकडे करून हे तुकडे डांबराबरोबर १६० अंश सेल्सियसला तापवले जातात. डांबराच्या सहा ते आठ टक्के प्लास्टिकचे तुकडे अशा प्रमाणात हे प्लास्टिक वापरले जात असून तापवल्याने प्लास्टिकचे तुकडे डांबरात व्यवस्थित मिसळले जातात. या प्लास्टिकमिश्रित डांबराचा थर खडीला व्यवस्थित चिकटतो. यामुळे रस्ते मजबूत होतात. साहजिकच रस्त्याचे आयुष्य वाढते, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.
टाकाऊतून टिकाऊ